पावसामुळे गुजरातमध्ये पूरपरिस्थिती, २६ लोकांचा मृत्यू

0
62

अहमदाबाद, दि. ३० (पीसीबी) :  गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे तीन दिवसात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हवामान विभागाने कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि पोरबंदरमध्ये 30 ऑगस्ट रोजीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मोरबी, जुनागड आणि राजकोटमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजासह यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वडोदरा, मोरबी आणि पोरबंदर या तीन जिल्ह्यातील हजारो लोक, पुरामुळे विस्थापित झाले आहेत.

गुरुवारी (29ऑगस्ट) गुजरामधल्या अनेक भागांमध्ये बचावकार्य सुरू होतं, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होतं. गुजरातच्या माहिती विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1,785 नागरिकांना वाचवण्यात यश आलं असून, 13 हजार 183 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी जामनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनीही वडोदरा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला.

गेल्या दोन दिवसात, फक्त वडोदरा जिल्ह्यातून, पुरात अडकलेल्या 1,271 लोकांना वाचवण्यात बचाव कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. तर, 10 हजार 335 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. यापैकी, 9 हजार 704 लोकांना वेगवेगळ्या निवारा छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच 333 लोक स्वतःच्या घरी परतले आहेत.