पालिका अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का…? : रविराज काळे

0
1

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. २६ मध्ये दुसऱ्या तीन प्रभागातील मतदारांची नावं दाखल झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. इतर प्रभागांमध्ये नोंद असलेले अनेक मतदार प्रभाग क्रमांक २६ मध्ये चुकीने समाविष्ट झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ही चूक निवडणूक प्रक्रियेतील आवश्यक संवेदनशीलतेचा अभाव आणि प्रशासनातील अनियमितता स्पष्ट करणारी आहे.

या गंभीर मुद्द्यावर आम आदमी पार्टी पिंपरी–चिंचवडचे शहराध्यक्ष रविराज बबन काळे यांनी कठोर भूमिका घेत, प्रशासनाकडे तातडीने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, “मतदारसंख्येतील असा गोंधळ ही केवळ चूक नसून नागरिकांच्या मताधिकारावर थेट आघात आहे.”

प्रभाग २६ मध्ये दुसऱ्या प्रभागातील इतके एकूण मतदार 4654 – मोठ्या प्रमाणात मतदार (प्रभाग 23,24,25) आणि दुबार मतदार 1897आहे असे काळे यांनी पुराव्यासह निदर्शनास आणून दिले.

शहराध्यक्ष काळे यांनी स्पष्ट केले की प्रभाग क्रमांक २६ ची वास्तविक मतदारसंख्या कृत्रिमरीत्या फुगवली गेली आहे. त्यामुळे प्रभागातील मतदारांचे प्रतिनिधित्व असंतुलित होत असून निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास ढासळत चालला आहे.

रविराज काळे यांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या :-
प्रभाग २६ मध्ये चुकीने समाविष्ट झालेले सर्व मतदार तात्काळ वगळावेत. संबंधित मतदारांची नावं त्यांच्या मूळ प्रभागात पुनर्स्थापित करावीत. ही चूक कशी आणि कुणाकडून झाली याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी.

रविराज काळे यांनी म्हटले आहे की, “अशा गंभीर चुका निवडणूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. नागरिकांच्या मताधिकाराचा आदर राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ सुधारात्मक पावलं उचलणं आवश्यक आहे.”