पालघरमध्येही शिवसेनेची बोट फुटली ..

0
293

मुंबई, दि. १६ (पीसीबी) : मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून राज्यभरात शिवसेनेला गळती लागली आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांचाही शिंदे गटाकडे कल वाढत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच पालघर जिल्ह्याचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्यासह शिवसेनेच्या ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोकणापाठोपाठ आता पालघर जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडल्याच दिसत आहे. शुक्रवारी (१५ जुलै) रात्री उशिरा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला.

याप्रसंगी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा पालघरचे माजी जिल्हाप्रमुख राजेश शहा आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते. वसई – विरार मनपातील पाच नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, विक्रमगड नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवक आदींनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या युतीच्या सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यांच्यासह वसई तालुका आणि बोईसरमधील पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील यांनीही शिंदे गटाला पाठिंबा निर्णय घेतला आहे. या पाठिंब्यानंतर शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागात ताकद वाढल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
इतकेच नव्हे तर मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, आणि पालघर नंतर आता कोकणात शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगरपरिषदेतील 23 पैकी 20 नगससेवक शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील 9 नगरसेवकांना शिंदे गटात सामील केले आहे. आता माजी मंत्री, बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे २० नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता उदय सामंत सुद्धा 20 नगरसेवकांना फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला.