पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु

0
5

मुंबई, दि.22 (पीसीबी)- महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. आता खातेवाटपानंतर अनेक मंत्र्यांची पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.

महायुतीच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. महायुतीकडून खातेवाटप झाल्यानंतर आता अनेक मंत्र्यांनी आपपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.

सध्या महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमत्रिपदावर मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे. त्यासोबतच अदिती तटकरे या देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर बीडमध्ये धनंजय मुंडे की पंकजा मुंडे पालकमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

तर दुसरीकडे मुंबईच्या पालकमंत्रिपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्रिपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहेत. त्यामुळे मुंबईतील पालकमंत्रिपदी कोण विराजमान होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.