पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घालणारी टोळी जेरबंद

0
120

पार्ट टाईम जॉब देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. फसवणुकीची घटना 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रावेत येथे घडली.

अल्ताफ मेहबूब शेख (वय 24, रा. जुनी सांगवी), मनोज शिवाजी गायकवाड (वय 23, रा. दापोडी), अनिकेत भाऊराव गायकवाड (वय 22, रा. नवी सांगवी), पवन विश्वास पाटील (वय 22, रा. पिंपरी), चैतन्य संतोष आबनावे (वय 21, रा. पिंपळे गुरव), सौरभ रमेश विश्वकर्मा (वय 23, रा. पिंपळे गुरव), कृष्णा भगवान खेडकर (वय 27, रा. घाटशीळ पारगाव, ता. शिरूर), हाफिज अली अहमद शेख (रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नडीगड्डा बाबू चीनमस्तन (वय 26, रा. रावेत. मूळ रा. आंध्र प्रदेश) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हाटसअपवर आरोपींनी ऑनलाईन पार्ट टाईम जॉब करण्याबाबत लिंक पाठवली. त्यातून त्यांना टेलिग्रामवर एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेत त्यांना टास्क खरेदी करण्यास सांगत त्यांच्याकडून 33 हजार रुपये घेतले. त्यावर त्यांना पाच हजार रुपये नफा देणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी नफा अथवा गुंतवलेली रक्कम न देता फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.