पिंपरी दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड वेगाने वाढणारे शहर असून विकासाला मोठी संधी आहे. शहरातील पायाभूत सुविधांसह आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यावर माझा भर राहील. ‘फिल्डवर’ उतरुन आणि लोकांची मते जाणून घेऊन घेऊन काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी आयुक्त आणि प्रशासकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आयुक्त सिंह म्हणाले, ”मोठी महापालिका आहे. महापालिकेचे देशात, राज्यात नाव असून चांगली प्रतिमा आहे. त्याची मला जाणीव आहे. मला शहरीकरणाचा जास्त अनुभव नसला. तरी, मी साता-याचा जिल्हाधिकारी असताना 17 नगरपरिषदांचे काम जवळून पाहिले. त्यामुळे शहरातील समस्या आणि उपाययोजना मला माहिती आहेत”.
”मी सिव्हील इंजिनिअर आहे. माझे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगही झाले आहे. या ज्ञानाचा वापर मी शहर विकासासाठी करेल. आरोग्य, शिक्षण क्षेत्रात मला आवड असून त्याला प्राधान्य देवू, मेट्रो, वाहतुकीचे प्रकल्प वेगाने मार्गी लावणे, सार्वजनिक वाहतूक सक्षण करण्यावर भर राहील. सारथी हेल्पलाईन सक्षम केली जाईल. विकास कामांवर भर राहील. लोकसहभाग, लोकांच्या मताची दखल घेतली जाईल. शहराचे सौंदर्य, वारसा जपण्यास कटिबद्ध राहील. पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदाची जबाबदारी मिळाल्यावर आनंदाची प्रतिक्रिया होती आणि जबाबदारीची जाणीवही होती”, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.
…