पान टपरीतून गांजाची विक्री

0
280

चाकण, दि. २५ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाळुंगे येथे एका पान टपरीमध्ये गांजा विक्री होत होती. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली. तसेच पावणे दोन किलो गांजा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) दुपारी दीड वाजता करण्यात आली.

शाहरुख नासिर खान (वय 19, रा .इंदोरी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश), निलेश विष्णू काळे (वय 49, रा. तळेगाव दाभाडे), परशुराम परकाळे (रा. मांदली, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र बांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रोडवर येलवाडी येथे एका पान टपरी मध्ये गांजा विक्री होत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी पान टपरीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक किलो 740 ग्रॅम गांजा आणि 700 रुपये रोख रक्कम असा 45 हजार 75 रुपयांचा गांजा जप्त केला. आरोपी शाहरुख याने हा गांजा निलेश यांच्याकडून आणला होता. तर निलेश याने परशुराम यांच्याकडून गांजा आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख आणि निलेश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.