पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करत मागितली खंडणी

0
285

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पानाचे पैसे मागितल्याने टपरी चालकाला मारहाण करून लुटले. त्यानंतर आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणत टपरी चालकाकडे खंडणी मागितली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमरास आठवण पान शॉप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दापोडी येथे घडली.

कुणाल बाळासाहेब पवार (वय 30, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमेध उर्फ गोट्या गायकवाड, बॉक्सी पठारे (दोघे रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पान टपरीमध्ये काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादीकडे पान मागितले. फिर्यादी यांनी पान देऊन त्यचे पैसे मागितले. त्यावरून सुमेध गायकवाड याने मी दापोडीचा भाई आहे. तू माझ्याकडे पैसे मागतो का, असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादींनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांना मारहाण करून शर्टच्या खिशातून एक हजार 450 रुपये काढून घेतले. त्यानंतर टपरी मधील गल्ल्यातून पाच हजार 575 रुपये काढून घेतले. एकूण सात हजार 25 रुपये काढून घेत, हे या महिन्याचे झाले. यापुढे प्रत्येक महिन्याला माला गुपचूप हप्ता द्यायचा. नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.