पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यास दिले जात आहे प्राधान्य‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काम सुरू

0
33

दि . २६ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत दापोडी, निगडी प्राधिकरणसह शहरातील विविध भागातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी बनवण्यात येत आहेत. या रस्त्यांवर सलगपणे चालताना पादचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य दिले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नागरिकांना/पादचाऱ्यांना सलगपणे समपातळीत सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीशी सुसंगत हे रस्ते असतील, याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देखील पादचारी नागरिकांसाठी विनाअडथळा फुटपाथ, स्वतंत्र सायकल ट्रॅक, बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासोबत सुरक्षितपणे नागरिकांना रस्ता ओलांडता येईल, यादृष्टिनेही उपाययोजना करण्यात येत आहेत. हा प्रकल्प राबवताना पथदिवे, चौकांची नव्याने रचना, सेवा वाहिन्या याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. ही सर्व कामे ‘इंडियन रोड्स काँग्रेस’ (आयआरसी) च्या मानकांनुसार केली जात आहेत.
पॅरिस, कोपनहेगन आणि अ‍ॅमस्टरडॅम अशा शहरांनी पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठी रस्त्यावर प्रवास सुरक्षित असावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या शहरांप्रमाणेच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते बनवण्यास प्राधान्य देत आहे.

पादचारी व सायकलस्वारांचे करण्यात आले सर्वेक्षण
‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना नागरिक, निवासी संस्था, विक्रेते, दुकानदार, वाहतूक पोलीस आदी सर्व घटकांशी सविस्तर सल्लामसलत करण्यात आली. नागरिकांचे अभिप्राय घेऊन ते रस्त्याच्या नियोजन व रचना प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आयटीडीपी इंडिया संस्थेने पादचारी आणि सायकलस्वारांचे सर्वेक्षण केले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर केलेल्या सर्वेक्षणात ७९ टक्के नागरिकांनी सांगितले की, रस्त्यांची रचना सुधारली गेल्यास सायकल चालवणे व फुटपाथवरून पायी चालण्याचे प्रमाण वाढेल. ८७ टक्के नागरिकांनी रस्त्याची सुरक्षित रचना आणि जागेचे पुनर्वितरण करण्यास पाठिंबा दिला. ८७ टक्के नागरिकांना रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ८२ टक्के नागरिकांनी सध्याचा रस्ता मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित असल्याचे सांगितले. ७६ टक्के नागरिकांना रात्री प्रवास करताना समस्या जाणवत होत्या तर ५९ टक्के नागरिकांनी अति वेगाने जाणारी वाहने ही मोठी समस्या असल्याचे मत मांडले.
या सर्वेक्षणाबाबत आयटीडीपी इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी यांनी सांगितले की, पादचारी व सायकलस्वार यांच्यासाठी प्रामुख्याने हा सर्व्हे होता. तर, ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे फक्त सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला जात नाही, तर हा प्रकल्प पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते देण्याच्या दृष्टिने व्यापक प्रक्रिया आहे, असे आर्किटेक्ट-अर्बन डिझायनर प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते केवळ वाहनांसाठी नाही तर पादचारी, सायकलस्वार यासह सर्वांसाठी सुरक्षित असतील, याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत. शहरातील रस्ते सुरक्षित करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. रस्त्यांची कामे करताना सार्वजनिक-खासगी वाहनांसोबतच पादचारी, सायकलस्वार नागरिक यांचाही विचार केला जात आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील काही भागातील रस्ते अरुंद झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर वाहनचालकांप्रमाणेच पादचारी, सायकलस्वार यांनाही रस्त्यांवरील प्रवास सुरक्षित करून देणे यास प्राधान्य देऊन आम्ही रस्त्याच्या लगत असलेली व वापरात नसलेल्या जागेचे पुनर्वितरण करून आणि पार्किंग व वाहन मार्गांची योग्य रचना करून रस्ते अधिक सुरक्षित व वाहतूक सुरळित होण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे बनवण्यास प्राधान्य देत आहोत, असे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
शहरात दर १०० लोकांमागे ९० खासगी वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे की, रस्ते रुंद करणे ही शाश्वत उपाययोजना नाही. असा उपाय करणे तात्पुरता मार्ग आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प प्राधान्याने राबवला जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसोबतच, पादचारी, सायकलस्वार यांचाही विचार करण्यात आला आहे, असे कार्यकारी अभियंता सुनिल पवार यांनी सांगितले.