पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी शहरातील पाणीपुरवठा वितरणासाठी महापालिकेकडून नवी कार्यप्रणाली

0
78

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा

पिंपरी दि.२९ (पीसीबी) :

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामधून शहरात पाण्याचे वितरण करण्यासाठी व्हॉल्व ऑपरेटर/पंप ऑपरेटर (मजूर) यांची पंप चालविण्यासाठी परिचाल ठेकेदाराकडून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागामध्ये पाणी वितरणाबाबत नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारींचा महापालिकेने गांभिर्याने विचार करीत गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी आणि कंत्राटदारांना बैठकीमध्ये मार्गदर्शन केले असून पाणीपुरवठ्यामध्ये विभागाने नियुक्त केलेल्या व्हॉल्व ऑपरेटर/पंप ऑपरेटर (मजूर) यांच्यावर निंयत्रण ठेवण्यासाठी पथकाची नेमणूक करावी. अशा सूचनासुध्दा दिल्या. याचबरोबर, पाणी वितरणामध्ये सहभागी कोणतीही व्यक्ती अथवा कंत्राटदार यांनी नियमभंग केल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल. असेही नमूद केले.

पाणीपुरवठा विभागाकडून पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यप्रणाली तयार

पाणी वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने एका नव्या कार्यप्रणाली स्वीकारली असून त्याद्वारे व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांच्यावर एका पथकाचे नियंत्रण राहणार आहे. त्याबरोबरच त्याचा अहवाल सुद्धा दर आठवड्याला विभागाला सादर करावा लागणार आहे.

चौकट – व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकाची नेमणूक
व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये, क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, एक व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) असणार आहे. सदर पथकावर क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता यांचे नियंत्रण राहणार आहे.

चौकट – नेमलेले पथक अशी करणार तपासणी…
पथक प्रत्येक पाणीपुरवठा टाकी येथे प्रत्यक्ष जाऊन टाकी वेळापत्रकानुसार वेळेवर भरली अथवा नाही किंवा दिलेल्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्यात येतो किंवा नाही याची तपासणी करणार आहे. त्याबरोबर, व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांची हजेरी तपासून त्यांनी गणवेश, ड्रेस कोड, ओळखपत्र परिधान केले किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार असून व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांचे कामकाजाचे रजिस्टर तपासून पथकाकडून स्वाक्षांकित करण्यात येणार आहे. मीटर रिडींग व क्वालिटी अनालायजरचे रिडींग तपाण्यात येणार आहे. त्याचबरोबर, पाण्याच्या टाकीवरुन पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विविध भागातील व्हॉल्व ऑपरेशन (काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन) दिलेल्या वेळापत्रकानुसार होते आहे की नाही याची सुध्दा तपासणी तपासण्यात येणार आहे.

चौकट – दर सोमवारी सादर करण्यात येणार अहवाल…
पाणी पुरवठा विभागाने व्हॉल्व ऑपरेशनसाठी नेमलेल्या पथकाचा अहवाल कनिष्ठ अभियंता व उपअभियंता संबंधित कार्यकारी अभियंता यांना दर आठवड्याच्या सोमवारी अहवाल सादर करणार आहेत. संबंधित पथकातील अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात एका प्रभागातील पाण्याच्या सर्व टाक्यांना भेट देणे आवश्यक असणार आहे.

पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी कटिबद्ध!

“पाणी वितरणामध्ये जे व्यक्ती किंवा कंत्राटदार नियमभंग करतील अशा महापालिकेचा कर्मचारी असेल तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पाणी वितरणासाठी नियुक्त केलेल्या व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही एक कार्यप्रणालीचा अवलंब केला असून त्याद्वारे इथून पुढे पाणी वितरणाचे काम करण्यात येणार आहे. आम्ही सर्व नागरिकांना न्याय्य पाणी वितरण करण्यासाठी आग्रही असून त्यासाठी कटिबद्ध आहोत.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड
    __
    नव्या कार्यप्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना तक्रारीची संधी न देण्याचा आमचा प्रयत्न

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने व्हॉल्व ऑपरेटर (मजूर) यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका पथकाची नेमणूक केली असून त्याद्वारे पाणी वितरणामध्ये कोणतीही कमी राहणार नाही. नव्या कार्यप्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना तक्रारीची संधी न देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

  • प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (1), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका