पाण्याची बाटली आणली नाही म्हणून स्वयंघोषित भाईने केला तरुणावर खुनी हल्ला

0
812

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पाण्याची बाटली आणण्यास नकार दिल्याने स्वयंघोषित भाई आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १५) रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बौद्धनगर, पिंपरी येथे घडली.

अशोक चिंतामण डोंगरे (वय ३०, रा. पिंपरी. मूळ रा. बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज किरवले (वय ३०), अविनाश माने (वय २६), गणेश जगदाळे (वय २०), पाशा (पूर्ण नाव माहिती नाही, वय २०, सर्व रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डोंगरे हे त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी सुरज याने डोंगरे यांना हाक मारून बोलावून घेत ‘एक पाण्याची थंड बाटली घेऊन ये’ असे सांगितले. त्यासाठी डोंगरे यांनी नकार दिला. त्यावरून आरोपींनी डोंगरे यांना शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ‘सुरज भाईला नाय म्हणतो. तुझा विषय संपला आता’ असे म्हणून डोंगरे यांच्या डोक्यात कोयता मारला. त्यात डोंगरे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.