‘पाणी जपून वापरा, अन्यथा… !’ महापालिकेचे आवाहन

0
552

उन्हाळा सुरू झाला आहे. पाऊस कधी सुरू होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दररोज होणे दूरच राहिले आहे. मागील पाच वर्षे रोज पाणीपुरवठा करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ असा खेळ खेळण्यात पालिका प्रशासन आणि तत्कालिन पालिकेच्या कारभार्‍यांनी घालवली. आता पाणी जपून वापरा असे आवाहन करून, दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा तर पालिका प्रशासनाचा मानस नाही ना? त्यासाठीच नागरिकांची मानसिक तयारी व्हावी, म्हणून असे आवाहन केले जात आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या धरणात मागच्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पाणी वाचविले तर पावसाळ्यापर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. तसेच पाण्याचा अपव्यय केल्यास नोटीस बजावण्यात येणार आहे.

महापालिकेकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका भागातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, उन्हाळा सुरु झालेला आहे. येणारा पावसाळा जून मध्ये सुरु होईल यांची शाश्वती नाही. पावसाळा हा विलंबाने सुरु झाल्यास पाण्याची टंचाई शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी आतापासून सर्व नागरिकांनी काटकसरीने व जपून वापरणे अत्यावश्यक आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळणे आवश्यक आहे.

यासाठी सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी हे घरगुती वापरासाठी योग्यरित्या व काटकसरीने वापरावे. पाणी हे शिळे होत नसल्याने शिल्लक असलेले पाणी फेकून देऊ नये. त्या पाण्याचा पुर्नवापर करावा तसेच, पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यासाठी, घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करणेसाठी, धुण्यासाठी वापरू नये. तसेच, सर्व सोसायटीधारकांनी एस.टी.पी. आणि बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांनामध्ये स्वच्छतागृह, सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता इत्यादींसाठी वापरावे, जेणेकरुन पिण्याच्या पाण्याची बचत होईल.

पिण्याच्या पाण्याचा गैरवापर गाड्या धुणे, रस्ते धुणे, घर, सोसायटी परिसर धुणे यासाठी करत असल्याचे निदर्शनास आलेस सदर ग्राहकांना गैरवापर होत असल्याबाबत प्रथमतः नोटीस बजाविण्यात येईल. तदनंतरही पुन्हा दुसऱ्यांदा असा पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करताना कोणीही आढळल्यास कोणतीही सबब, ऐकून घेतली जाणार नाही व तात्काळ नळजोड तोडण्यात येईल. तरी सर्व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पाणी हे जीवन आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा. ते जपून वापरावे म्हणजे पाण्याची बचत होईल व यामुळे यावर्षी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत म्हणजे माहे- जुन व जुलै पर्यंत पाणी सर्वांना पुरेसे उपलब्ध होऊ शकेल आणि पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही व यंदाचा उन्हाळा सर्वांना सुसह्य जाईल.

तरी यासाठी सर्व नागरिकांना पुनश्चः विनंती करणेत येते की, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याची बचत खालीलप्रमाणे सहज करु शकता.
१) पिण्याचे पाणी वाहने स्वच्छ करण्याकरिता वापरु नका.
२) अंगण, जिने किंवा फरशी धुणे टाळा, स्वच्छतेकरिता कमीत कमी पाण्याचा वापर करा.
३) घरातील गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करुन घ्या.
४) घरासमोरील रस्त्यावर पाणी मारु नका, रस्ते धुवू नका.
५) कुंड्यातील झाडे, बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करु नका.

तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काटकसरीने पाणी वापरावे व पाण्याची बचत करावी, जेणेकरुन येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निर्माण होणार नाही.