पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे आश्वासन आणि पिंपळे निलख, विशालनगर येथील हंडा मोर्चा स्थगित – सचिन साठे

0
23

पिंपरी, दि. १० – मागील दोन महिन्यापासून पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत होता. याप्रश्नी महानगरपालिकेच्या निष्क्रिय, निद्रिस्त पाणीपुरवठा विभागाला जाग आणण्यासाठी भाजपा नेते सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ प्रभाग कार्यालय वर शुक्रवारी ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा या भागातील सर्व नागरिकांनी दिला होता.
मनपा ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हेमंत देसाई आणि कनिष्ठ अभियंता साकेत पावरा यांनी सचिन साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी भेट देऊन तेथील नागरिकांसोबत बैठक घेतली यावेळी माजी पोलीस पाटील भुलेश्वर नांदगुडे, अशोक बालवडकर, रवींद्र काटे, आनंद कुंभार, नरेंद्र गायकवाड, काळूशेठ नांदगुडे, नागेश जाधव, पंडित गराडे, साहेबराव नांदगुडे, महेंद्र बिराजदार, संजय पटेल, विजय पाटुकले, सचिन जाधव, विनायक बोडके, राजाभाऊ मासूळकर, गणेश देशमुख, प्रमोद दळवी आणि पिंपळे निलख, विशाल नगर, वाकड भागातील रहिवासी, सोसायट्यांचे प्रतिनिधी, नागरिक आदी उपस्थित होते.
मनपा ‘ड’ प्रभाग पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता हेमंत देसाई यांनी या बैठकीत उपस्थित नागरिकांना जाहीर आश्वासन दिले की, यापुढे पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही. तसेच पाणीपुरवठा बाबतच्या तांत्रिक समस्या लवकरच दूर केल्या जातील आणि येथील नागरिकांना पूर्ण क्षमतेने नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल त्यामुळे नागरिकांनी शुक्रवारी आयोजित केलेला हंडा मोर्चा स्थगित करावा अशी विनंती केली.
पाणीपुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनामुळे शुक्रवारी (दि.११ एप्रिल) आयोजित केलेला हंडा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे अशी माहिती सचिन साठे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.