पाच वर्षात पाच पीएम, अशा लोकांच्या हातात तुम्ही देश देणार का ?

0
215

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नरेंद्र मोदी यांनी जय-जय रामकृष्ण हरी नावाचा जयघोष करत भाषणात रंगत आणली. 2024 मध्येच या आधी मी सोलापूरला आलो होतो. मात्र, त्यावेळी तुम्हाला द्यायला आलो होतो, आता मात्र मी तुमच्याकडे मागण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मला सोलापूरकरांचा आशीर्वाद हवा आहे. मी तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मला तुमच्याकडून धन-दौलत नको आहे. तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद हवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

माझे काम तुम्ही गेल्या दहा वर्षात पाहिले आहे. एकिकडे माझे काम आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये नेतृत्वासाठी भांडणे चालू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सध्या इंडिया आघाडीत महायुद्ध सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आता पाच वर्षात पाच पीएम म्हणजे दरवर्षी एक पंतप्रधान करणार असल्याचे इंडिया आघाडीचे नेते सांगत आहेत. म्हणजे ते एका वर्षात एक पीएम. एका वर्षात तो जेवढी लूट करू शकतो, तेवढी लूट करेल. अशा लोकांच्या हातात तुम्ही देश देणार का? असा प्रश्न नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मतदारांना विचारला आहे.

त्यांना फक्त मलाई खायची –

नकली शिवसेना देखील आपल्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक उमेदवार असल्याचा दावा करत आहे. त्यांच्यातीलच एका बडबडा नेता आम्ही दरवर्षी नवीन पीएम बनवणार असल्याचा दावा करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. अशा पद्धतीने देश चालू शकतो का? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. त्यांच्यापुढे सत्ता मिळवणे, हा एकच रस्ता शिल्लक राहिला असल्याचे मोदी म्हणाले. त्यांना देश चालवायचा नाही, तुमच्या भविष्याची चिंता नाही. त्यांना तर केवळ मलई खायची असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी काम केले
महाराष्ट्र म्हणजे सामाजिक न्यायाची धरती आहे. या धरतीतून ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने महान सुपुत्र दिले आहेत. त्यांनी समाजातील सर्वात कमजोर वर्गाला ताकद देण्याचे आणि प्रेरणा देण्याचे काम केले आहे. तुम्ही काँग्रेसच्या साठ वर्षाचे प्रशासन पाहिला आहे. तर मोदींचा दहा वर्षाचा सेवाकाळ देखील तुम्ही पाहिला असल्याचे मोदी म्हणाले. मागील दहा वर्षात सामाजिक न्यायासाठी जेवढे काम झाले तेवढे काम स्वातंत्र्यानंतर साठ वर्षात कधीही झाले नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

काँग्रेसने आपल्या साठ वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांना सत्ता उपभोगण्याचा संधी मिळालेली असताना एसटी, एनटी, ओबीसी वर्गातील प्रत्येकाचा हक्क थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामागे त्यांची विचारसरणी देखील तशी होती. या समाजाला असेच ठेवा आणि त्यांचे मतदान घेत रहा. काँग्रेसने मुद्दाम या वर्गाला त्रास दिला असल्याचा आरोप मोदी यांनी केला आहे. मात्र, मोदींचा आणि तुमचा ‘दिल का नाता है’ असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात खऱ्या सामाजिक न्यायाला आम्ही अभूतपूर्व बल दिले असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 6 सभा होणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात बारामती, माढा आणि सातारा या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या प्रचारसभा घेणार आहेत. दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण 6 सभा होणार असून यात आज पुणे, कराड आणि सोलापुरात सभा होणार आहेत. तर उद्या मंगळवारी, 30 एप्रिल रोजी माढा मतदारसंघातील माळशिरस, त्यानंतर धाराशिव आणि लातूर येथे सभा होणार आहेत. राज्यात इतक्या सलग सभा घेण्याची ही मोदींची पहिलीच वेळ आहे.