पाच माजी मुख्यमंत्र्यांची मुले मध्य प्रदेशच्या रिंगणात

0
287

भोपाळ, दि. १६ (पीसीबी) – उद्या म्हणजे शुक्रवारी मतदान होत असलेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांची मुले रिंगणात आहेत. या माजी मुख्यमंत्र्याच्या यादीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश आहे.

घराणेशाहीवरून भाजप नेते नेहमीच काँग्रेसवर टीका करतात. पण घराणेशाहीत भाजपही मागे नाही. अलीकडेच कर्नाटकात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या पुत्राची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपनेही घराणेशाहीचा अपवाद नाही हे दाखवून दिले. मध्य प्रदेशातही भाजपने घराणेशाहीतील काही जणांना उमेदवारी दिली आहे.

हे ते पाच माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र :
१) जयवर्धन सिंह (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. २०१३ मध्ये ५९ हजार तर २०१८ मध्ये ६४ हजार मतांनी ते निवडून आले होते. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन महत्त्वाची खाती त्यांनी भूषविली होती. जयवर्धन सिंह यांच्या विरोधात भाजपने काँग्रेसच्या एका माजी आमदाराच्या मुलाला उमेदवारी दिली आहे.

२) ध्रूव नारायण सिंह (भाजप) : माजी मुख्यमंत्री गोविंद नारायण सिंह यांचे पुत्र. १९६७ ते १९६९ या काळात सिंह यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. काँग्रेसबरोबर मतभेद झाल्यावर गोविंद नारायण सिंह यांनी १९६७ मध्ये लोक सेवक दलाची स्थापना केली होती. भारतीय जनसंघाच्या मदतीने त्यांनी दोन वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ध्रुव नारायण सिंह हे २००८ मध्ये विधानसभेत निवडून आले होते. पण एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येत त्यांचे नाव आल्याने पुढे भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली होती.

३) दीपक जोशी (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे दीपक हे पुत्र. १९९७७ ते १९७८ या जनता पक्षाच्या सरकारच्य काळात जोशी हे मुख्यमंत्री होते. २००३, २००८ आणि २०१३ मध्ये जोशी हे भाजपच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. २०१८ मध्ये पराभूत झाले. पक्षात महत्त्व मिळत नसल्यानेच दीपक जोशी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

४) अजय सिंह (काँग्रेस) : माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांचे अजय हे पुत्र. गेली अनेक वर्षे ते विधानसभेवर निवडून येत होते. दिग्वजयसिंह यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत अजय हे पराभूत झाले होते. आता पुन्हा ते नशीब अजमवत आहेत.

५) ओमप्रकाश सकलेचा (भाजप) : माजी मुख्यमंत्री वीरेंद्र कुमार सकलेचा यांचे ओमप्रकाश हे पुत्र. चार वेळा विधानसभेवर निवडून आलेले ओमप्रकाश सध्या शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळात मंत्री आहेत.