दि . १८ . पीसीबी – महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाचे प्रचंड थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती चिंताजनक झाली असून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशातच हवामान खात्याकडून राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता चांगलीच वाढली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, पालघर, ठाणे, संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसताय. आज रात्रभरात ठिकठिकाणी ६० ते १०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.