पाच जणांचा बळी घेणाऱ्या अनधिकृत होर्डिंग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
353

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) – बेंगलोर-मुंबई महामार्गालगत किवळे येथे भलामोठा अनधिकृत होर्डिंग कोसळून पाचजण ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जागा मालक, होर्डिंग बनवणारा, होर्डिंग भाड्याने घेणारा आणि जाहिरात देणारी कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता घडली.

जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

शोभा विजय टाक (वय ५०, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय ५०, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय २९, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय ३३, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय ४५, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विशाल शिवशंकर यादव (वय 20, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय 21, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.