पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानात २३ टक्के हिंदू होते, गेले कुठे ?

0
172

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – देशभरात सध्या CAA च्या मुद्द्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातही या कायद्यासाठी मोदी सरकारने अधिसूचना काढण्याच्या वेळेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कायदा २०१९मध्येच पारित झाला असताना अधिसूचना काढण्यासाठी २०२४च्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अवघ्या काही दिवस आधीचा मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएएसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या अनेक मुद्द्यांना एएनआयच्या पॉडकास्टमध्ये उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील हिंदूंच्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला.

“जनसंघानं नेहमीच फाळणीचा विरोध केला”
“१९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. देश तीन भागांत विभागला गेला. ती पार्श्वभूमी आहे. भारतीय जनसंघ, भाजपानं नेहमीच विभाजनाला विरोध केला आहे. आम्ही कधीच सहमत नव्हतो. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर व्हायलाच नको होती. पण त्यावेळी ती केली गेली. फाळणीनंतर तिथल्या अल्पसंख्यकांवर अनन्वित अत्याचार झाले, धर्मपरिवर्तन केलं गेलं. त्यांच्या महिलांना अपमानित केलं. ते जर भारताच्या आश्रयाला आले, तर त्यांना इथल्या नागरिकत्वाचा अधिकार नाहीये का?” असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला.

“काँग्रेसच्या नेत्यांनीच फाळणीच्या वेळी सांगितलं होतं की आत्ता दंगली चालू आहे. त्यामुळे जिथे असाल तिथेच थांबा. नंतर जेव्हा केव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा तुमचं स्वागत होईल. पण नंतर निवडणुकांचं, वोटबँकेचं राजकारण चालू झालं. ते आश्वासन काँग्रेसनं कधीच पूर्ण केलं नाही”, असं ते म्हणाले.

“…तर मग सगळ्यांसाठीच दरवाजे उघडावे लागतील”
“मुस्लीम लोकसंख्येसाठीच देशाची फाळणी करून स्वतंत्र देश देण्यात आला. मग तर प्रत्येक देशातल्या दुरवस्थेमुळे तिथल्या लोकांसाठी भारताचे दरवाजे उघडावे लागतील. जे लोक फाळणीच्या आधी अखंड भारताचा भाग होते आणि ज्यांच्यावर नंतर धार्मिक अत्याचार झाले त्यांना आश्रय देणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असं मी मानतो”, अशा शब्दांत अमित शाह यांनी त्यांची भूमिका मांडली.

“कुठे गेले ते सगळे हिंदू?”
दरम्यान, पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये फाळणीवेळी असणारी हिंदूंची संख्या आता अत्यल्प झाली आहे. हे सगळे हिंदू कुठे गेले? असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला. यासाठी त्यांनी आकडेवारीही सादर केली. “जेव्हा फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानात २३ टक्के हिंदू आणि शीख होते. आज ३.७ टक्के उरले आहेत. कुठे गेले हे सगळे? त्यांचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं. त्यांना अपमानित करण्यात आलं. दुय्यम नागरीक म्हणून त्यांना वागवलं गेलं. कुठे जाणार हे लोक? देश याचा विचार करणार नाही का?” असा प्रश्न अमित शाह यांनी केला.

“१९५१मध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंचं प्रमाण २२ टक्के होतं. २०११ च्या जनगणनेत ते प्रमाण १० टक्के उरलं. कुठे गेले हे लोक? अफगाणिस्तानमध्ये १९९२च्या आधी जवळपास २ लाख शीख व हिंदू होते. आज तिथे जवळपास ५०० उरले आहेत. या लोकांना त्यांच्या श्रद्धांनुसार आयुष्य व्यतीत करण्याचा अधिकार नाही का? भारत एकसंघ होता, तेव्हा ते सर्व आपलेच होते. जर हेच तत्व ठेवायचं असेल, तर मग फाळणीनंतर इतक्या शरणार्थींना का देशात ठेवून घेतलं? मग त्यालाही काही अर्थ नाही”, असंही ते म्हणाले.