पाकिस्तानी बोटीतून तब्बल २०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त

0
202

अहमदाबाद,दि.१६(पीसीबी) – गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) भारतीय तटरक्षक दलासह केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात एका पाकिस्तानी मासेमारी बोटीतून २०० कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉइन जप्त केले, तर सहा पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली.

कच्छ जिल्ह्यात जखाऊ बंदराजवळ तटरक्षक दल आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ड्रग्ज घेऊन जाणारी बोट समुद्राच्या मध्यभागी अडविली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुजरातच्या किनाऱ्यावर हेरॉइन उतरविल्यानंतर रस्ता मार्गाने पंजाबला नेले जाणार होते. याबाबतची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर पाकमधून निघालेली ही बोट आम्ही पकडली आणि ४० किलो हेरॉइनसह सहा पाकिस्तानी लोकांना पकडले.

अशी केली कारवाई- तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पाकिस्तानी बोट भारताच्या हद्दीत सहा मैल आत होती. गुजरातमधील जखाऊ बंदरापासून काही अंतरावर ही बोट दिसून आली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या दोन बोटींनी ही बोट पकडली. या बोटीतील पाकिस्तानी नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे.