पाकिस्तानात स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक; आत्त्मघातकी हल्ला, 24 जणांचा मृत्यू

0
236

विदेश,दि.१३(पीसीबी) – पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झालाय. दहशतवाद्यांनी उत्तर-पश्चिम पाकिस्तानातील एका पोलीस स्टेशनला स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने धडक मारली. धडकेनंतर स्फोटकांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यात 24 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनख्वामधल्या अफगाणिस्तान सीमेजवळच्या डेरा इस्माइल खान भागात झाला. पाकिस्तान लष्कराकडून या पोलीस स्थानकाचा वापर बेस कॅम्प म्हणून केला जात होता. स्फोटात जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला ट्रक थेट पोलीस स्टेशन इमारतीत घुसवला. त्यानंतर काही दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला प्रत्त्युत्तर देताना पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी तालिबानी ग्रुप तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने या हल्लाची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेकडून सातत्याने पाकिस्तान लष्काराला टार्गेट केलं जात आहे. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान संघटनेला इस्लामी दहशतवाद्यांचा पाठिंबा आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दहशतवादी हल्ल्यानंतर आपातकालिन परिस्थिती घोषित करण्यात आली. परिसरातील सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले.

दहशतवादी हल्ल्याची ही पहिलीच घटना नाहीए. गेल्या महिन्यात खैबर पख्तूनख्वा भागात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. यात तीन जणांचा मृत्यू झाला. दोन वेगळ्या दहशतवादी संघटनांनी हे हल्ले केले. उत्तरी वजीरिस्तान जिल्ह्यातील मीर अली तहसील भागात झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन सैनिकांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत इस्माइल खान जिल्ह्यातील द्रजिंदा तहसील भागातील तेल आणि गॅस कंपनीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यात कंपनीच्या एक वाहन चालकाचा मृत्यू झाला. तर अकराजणं गंभीर जखमी झालेत.

दहशतवाद्यांकडून पाकिस्तान सैन्याला टार्गेट करण्यात आलं असून सातत्याने हल्ले केले जात आहेत. 4 नोव्हेंबरला पाकिस्तानातल्या दक्षिण बलूचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी सेनेच्या दोन गाड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 14 सैनिक मारले गेले. बलुचिस्तानमध्ये झालेला हा हल्ला पाकिस्तानला यावर्षातला सर्वात मोछा दहशतवादी हल्ला मानला जातोय. या हल्ल्यात सर्वाधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते.