पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेसवर बलुतींचा हल्ला, संघर्षात लष्कराचे ३० जवान शहीद

0
4

दि . 12 ( पीसीबी ) – भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तानमधील अशांत अशा बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांनी सुमारे ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला आणि त्यांनी या रेल्वेचं अपहरण केलं आहे. ट्रेनमधील प्रवाशांची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर लष्कर व फुटीरतावाद्यांमध्ये काही चकमकी झाल्या. पाकिस्तानी सरकारने या घटनेबाबत, त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कारवाईबाबत फारशी माहिती उघड केली नसली तरी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) जाफर एक्सप्रेसमधील सुरक्षा दलांसह २१४ हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे.तसेच, यावेळी फुटीरतावादी व पाकिस्तानी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात लष्कराचे ३० जवान शहीद झाल्याचा दावा बीएलएने केला आहे.

पाकिस्तानी सुरक्षा बलाने माघार घेतली नाही तर ओलिसांना ठार मारू अशी धमकी बीएलएने दिली आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की आम्ही फुटीरतावाद्यांच्या ताब्यातून १०४ नागरिकांची सुटका केली आहे. हा हल्ला बीएलएच्या माजिद ब्रिगेडने केला आहे, जी बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बीएलएने पाकिस्तान आणि चीनविरुद्ध नवीन तीव्र आक्रमणाची अलीकडेच घोषणा केली होती. त्यानंतर आता हा हल्ला झाला आहे.