पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांची आघाडी

0
393

कराची, दि. १० (पीसीबी) – पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे इम्रान खान हे सध्या तुरुंगात असून, त्यांना निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले होते.

पाकिस्तानच्या संसदेत 336 जागा असून, त्यापैकी 266 जागांसाठी मतदान होते. त्यामुळे 165 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. त्यापैकी 60 जागा महिलांसाठी, तर दहा जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत. सत्ता स्थापनेसाठी 133 जागांवर विजय मिळणे आवश्यक आहे. गुरुवारी मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने सुरू केलेली मतमोजणी अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे.
आतापर्यंत आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इंसाफ (PTI) पक्षाने पाठिंबा दिलेले 60 अपक्ष उमेदवार विजयी झाली आहेत, तर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ (PML-N) या पक्षाला 43 जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीने (PPP) 37 जागा जिंकल्या आहेत. बिलावल झरदारी भुट्टो यांचा हा पक्ष आहे.

निवडणुकीत या तीन पक्षांमध्ये खरी लढत आहे. सध्याच्या निकालाचे कल पाहता कोणत्याही पक्षाला 133 हा जादुई आकडा गाठता येणार नसल्याचे दिसते. असे असले तरी इम्रान खान यांचा पक्ष बहुमताजवळ पोहाेचू शकतो. मात्र, नवाझ शरीफ यांच्या पक्षाकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.

नवाज शरीफ अपक्षांच्या संपर्कात?
सत्ता स्थापनेसाठी नवाज शरीफ यांनी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जात आहे. काही अपक्ष उमेदवार तसेच इतर छोट्या पक्षांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांशीही ते संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानात कुणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.