पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल

0
126

नवी दिल्ली, दि. १४ ऑगस्ट (पीसीबी) – देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असून देशभक्तीच्या वातावरणात प्रत्येकजण जुन्या आठवणी जागवताना दिसून येत आहेत. यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असून राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला जाणार आहे. तर, दुसरीकडे दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फाळणी विरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. पाकिस्तानचे एकतर भारतात विलगीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले आहे.

जेव्हा अध्यात्मिक जगतात एखाद्याचं वास्तविक स्वरुप नसतं, तेव्हा त्यास नष्ट व्हावेच लागेल. त्यांच्या नस्वरतेकडे आपण संशयाच्या नजरेतून पाहिलं नाही पाहिजे. आम्ही हेच मानलं पाहिजे की ते होईल. मात्र, त्यासाठी आम्हालाही तयार असावेच लागेल. आपल्याला त्या चुकांवर विचार करावा लागेल, ज्यामुळे विदेशातील दृष्ट शक्तींना भारतात घुसणे आणि आपल्या देशातील पवित्र स्थळांवर हल्ला करण्याची संधी मिळते. भारताची अखंडता आणि संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आपणास ते करावेच लागेल. विभाजनचा विचार सोडून राष्ट्र म्हणून आपण एकच विचार केला पाहिजे. जातीय, प्रादेशिक आणि भाषिक विभाजनाच्या पुढे जाऊन आपण राष्ट्र प्रथम हा मंत्री अंगीकरुन काम केलं पाहिजे, असे योगी आदित्यनाथ यांनी लखनौमधील कार्यक्रमातून बोलताना म्हटले.

बांग्लादेशमध्ये आज दीड कोटींपेक्षा जास्त हिंदू ओरडून ओरडून आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, जगाचं तोंड बंद आहे. देशातील धर्मनिरपेक्षवाद्यांची तोंडं बंद आहेत, कारण आम्ही कमजोर आहोत. आपली व्होट बँक आपल्यापासून दूर जाईल, या हेतुने हे सर्वजण गप्प आहेत. व्होट बँकेसाठी मानवीय संवेदना मारुन टाकल्या आहेत. मानवतेच्या रक्षणासाठी त्यांच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. कारण, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी त्याच प्रकारच्या राजकारणाला प्रोत्साहन दिलं आहे. फोडा आणि राज्य करा याच पद्धतीचं राजकारण ही मंडळी करत आहेत, असे म्हणत देशातील इंडिया आघाडीच्या पक्षातील नेत्यांवर नाव न घेता हल्ला बोला केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी पाकिस्तानलाही गर्भीत इशारा दिला आहे. एकतर पाकिस्तान भारतात विलीनीकरण होईल, नाहीतर पाकिस्तान इतिहासातून नष्ट होईल, असे योगींनी म्हटले. योगींच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.