पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता केला दुसरा विवाह

0
436

दिघी, दि. ९ (पीसीबी) – पतीने पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला. विवाहितेची कागदपत्रे खोटा व्हिसा मिळविण्यासाठी अमेरिका आणि भारतात सादर केली. तसेच सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ जून २००४ ते ८ जून २०२२ या कालावधीत दिघी, केरळ येथे घडला.

विनयदास हरिदास नांबियार (वय ४४), श्रीदेवी हरिदास नांबियार (वय ६५), हरिलाल विनयदास हरिदास नांबियार (वय ३९, सर्व रा. केरळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती विनयदास याने फिर्यादीला कोणताही घरखर्च न देता, फिर्यादीचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच फिर्यादीशी घटस्फोट न घेता त्याने दुसरे लग्न केले. फिर्यादी यांची व्हिसा मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे अमेरिका व भारतात सादर केली असण्याची फिर्यादीस शंका आहे. अन्य आरोपींनी माहेरहून पैसे आणावे म्हणून फिर्यादीचा मानसिक छळ केला. फिर्यादीला सासरी नांदवण्यास नकार दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.