पहिल्या टप्प्यात नागपूरसह पाच जागांवर शुक्रवारी मतदान

0
185

महिन्याभरापूर्वी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आणि देशभरात निवडणुकीच्या तयारील भलताच वेग आला. पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्या, निवडणूक अर्ज, प्रचारसभांनाही वेग आला. उद्या ( १९ एप्रिल) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात होणार असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उद्यापासून मतदानास सुरूवात होणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होईल.

मुख्य लढती कोणाच्या ?
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीकरून पाठिंबा देण्यात आला आहे . चंद्रपूरची लढत सुद्धा लक्षवेधी होण्याची चिन्हे आहे. 15 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गडचिरोलीमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे. भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे किरसन नामदेव असा सामना रंगणार आहे.

रामटेकची लढत देखील लक्षवेधी
रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत लोकसभेचे उमेदवारी मिळवली आहे. शिंदे गटात सामील झालेल्या विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कट करून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी अभिनेता गोविंदा यांनीही प्रचार केला होता. काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने त्या अडचणीत सापडल्या होत्या. अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली.

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.