पहिल्याच दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ ला चांगला प्रतिसाद, कमवले ‘एवढे’ कोटी

0
479

मनोरंजन,दि.१०(पीसीबी) – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या अंदाजे कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे आकडे पाहता ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केल्याचे म्हटले जात आहे.

लागोपाठ अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरल्यानंतर सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या यशाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शनवरही बॉलिवूडचे लक्ष लागून राहिले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे बोलले जात आहे.

आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय आणि शाहरुख खान यांच्याही कॅमिओ भूमिका आहेत. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी 35 ते 36 कोटींची कमाई केल्याचा अंदाज बांधला आहे. कोरोना कालावधीनंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ हा सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने साऊथमध्येही चांगली कमाई केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ने दक्षिणेत 9-10 कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी 2021मध्ये रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ने पहिल्या दिवशी सुमारे 37 कोटींची कमाई केली होती.

पहिल्या दिवशीचे आकडे पाहता ‘ब्रह्मास्त्र’ वीकेंडला 100 कोटींचा आकडा पार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाला चांगली अ‍ॅडव्हान्स बुकिंग मिळाली होती. मात्र, या चित्रपटाची खरी कमाई सोमवारनंतर कळणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाला फारसे चांगले रिव्ह्यू मिळालेले नाहीत. सोशल मीडियावरही बरेच लोक या चित्रपटावर टीका करत आहेत. मात्र, चाहते आलिया आणि रणबीरची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 410 कोटींचे बजेट खर्च करण्यात आले आहे, त्यामुळे ओपनिंगसोबतच आगामी काळातही बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात नागार्जुन आणि राजामौली यांची नावे देखील सामील असल्याने दक्षिणेतही चित्रपटाची जोरदार चर्चा रंगणार आहे आणि चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळणार आहे. उर्वरित राज्यांमध्ये अर्थात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातही चित्रपट चांगला व्यवसाय करू शकतो. या चित्रपटात नागार्जुन मुख्य भूमिकेत नाही, त्यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये हा डब करून प्रदर्शित होणारा हिंदी चित्रपट मानला जाईल. तरीही रणबीरच्या स्टारडमचा आणि चित्रपटाच्या प्रमोशनचा याला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.