दि . १९ ( पीसीबी ) – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन केले जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. प्रकाश आंबडेकर यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामधून प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारला आहे. “मोदी, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तब्बल महिनाभर उलटून गेला आहे. तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही, असे प्रकाश आंबेडकरांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एप्रिल महिन्यात 22 तारखेला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सहा पर्यटक महाराष्ट्रातील होते. दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना गोळ्या घातल्या होत्या. बहुतांश पर्यटकांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारतीय सैन्याने 7 एप्रिलला ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून याचा बदला घेतला होता. यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करुन उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत असणाऱ्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश होता. भारतीय सैन्याच्या या एअर स्ट्राईकमध्ये तब्बल 100 दहशतवादी ठार झाले होते.