पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख, सरकारी नोकरी

0
4

मुंबई, दि. २८ : राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय, सरकार पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असल्याचंही राज्य सरकारने सांगितलं आहे. त्याशिवाय, आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचाही निर्णय घेतला गेला आहे.

राज्य सरकारची पीडितांना मोठी मदत
पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं जात आहे.

महाराष्ट्रातील मृतांची नावे

1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल

पीडित कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडून वापरण्यात आला आहे. राज्यसरकारकडून यासंदर्भात मदत देण्यात येत आहे. ५० लाखांचं अर्थसहाय्य सरकारकडून देण्यात येणार आहे. तसेच, शिक्षण आणि रोजगारात अडचण येऊ नये, याचीही खात्री करण्यात आली आहे.

या हल्ल्यात संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोरच त्यांना गोळ्या घातल्या. याचा मोठा धक्का त्यांच्या कुटुंबाला बसला आहे. सरकारने संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आसावरी जगदाळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. यामुळे आमच्या कुटुंबाला आधार मिळेल, असं त्या म्हणाल्या.