पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिल वसूली मोहिमेला वेग

0
213

पुणे, दि. ६ (पीसीबी) : दिवाळी प्रकाशाचा सण म्हणून नुकतीच उत्साहात साजरी झाली. मात्र सर्वांना प्रकाशमान ठेवणाऱ्या महावितरणच्या वीजबिलांकडे ग्राहकांकडून गेल्या नोव्हेंबरमध्ये चांगला प्रतिसाद दिला नाही. परिणामी आर्थिक कोंडी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत १८ लाख २ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे ३७६ कोटी ६७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यात पुणे जिल्हा- २३० कोटी २१ लाख रुपये (८ लाख ५२ हजार ग्राहक), सातारा २७ कोटी (२ लाख १४ हजार ग्राहक), सोलापूर- ५४ कोटी ४३ लाख (२ लाख ७४ हजार ग्राहक), कोल्हापूर- ३६ कोटी २० लाख (२ लाख ४५ हजार ग्राहक) आणि सांगली जिल्ह्यात २८ कोटी ८३ लाख रुपयांची (२ लाख १७ हजार ग्राहक) थकबाकी आहे.

महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. वीजखरेदीमध्ये दरमहा महसूलामधील सुमारे ८० टक्के रक्कम खर्च होते. त्यानंतर दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना आदींचा खर्च वीजबिलातून मिळालेल्या महसूलावरच अवलंबून आहे. गेल्या महिन्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली. मात्र इतर खर्चाच्या तुलनेत चालू महिन्याचे वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या थकबाकीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. थकबाकी तसेच चालू महिन्याचे वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांच्या थकबाकीमध्ये सर्वाधिक १५ लाख ९१ हजार २४६ घरगुती ग्राहकांकडील २४१ कोटी ५२ लाख रुपये तर २ लाख १० हजार ७४४ वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील १३५ कोटी १४ लाख रुपयांचा समावेश आहे. वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे. आता एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.