पवार, मुश्रिफ, चव्हाण यांच्यावर आता मोदी का बोलत नाहीत ? – संजय राऊत

0
123

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भ्रष्टाचारींना त्यांच्या पक्षात सामावून घेतलं आहे. त्यावर मोदी काहीच बोलत नाही. मोदी सर्व विषयांवर बोलतात. प्रश्न हा राजकीय किंवा गैरराजकीय नाही. प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्वशर्मा, सुवेंद्रू धर्माधिकारी यांना तुम्हीच भ्रष्ट म्हणत होतात. तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. आता त्यांच्यावर का बोलत नाही? तुमच्याकडे बोलण्याची स्क्रिप्ट नसेल तर आम्ही तयार करून देतो, असं सांगतानाच मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाही. हे आपण संसदेत आणि संसदेबाहेरही पाहिलं आहे, असा हल्लाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या मुलाखतीवर ते बोलत होते.

मोदींनी 10 वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचाची त्यांची छाती आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो. पण त्याचं मोजमाप खरं असावं, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमका काय? असा सवाल राऊतांनी विचारला होता. याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देत जे पत्र्याच्या घरात राहतात, त्यांनी पत्र लिहू नये असं म्हणत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच त्यांनी केलेले आरोपही फेटाळून लावले. त्यांच्या याच टीकेला संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ते नक्की सुशिक्षित आहेत ना, ते जे कोण बाळराजे ( श्रीकांत शिंदे) आहेत त्यांना लिहिता वाचता येतं ना, ते हाड वैद्य आहेत त्यांनी कधी माणसांची की जनावरांची हाड तपासली ते पहा, असा टोला लगावला. मला जेव्हा न्यायालयाने सोडलं तेव्हा जे निकाल पत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे, मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्टिकोनाने कसं कोणाला अडकवलं जातं हे बाळराजेंना कळेल असेही राऊत म्हणाले.

जे काही ते फाउंडेशन आहेत त्यावर आतापर्यंत पाचशे ते सहाशे कोटी रुपये गोळा करण्यात आले ते केलेत की नाही ते त्यांनी सांगावं असं म्हणत त्यांच्या दहा वर्षातील त्यातही मुख्यत: (गेल्या) अडीच वर्षातली जी उधळपट्टी आहे ती 100 कोटींच्या वर आहे. सातपुते यांनी जी तक्रार केली आहे त्यावर आपण का बोलत नाही, असा सवाल विचारत तुम्हालाही नरेंद्र मोदींची तुम्हाला हवा लागली आहे, त्यांच्याप्रमाणेच इधर उधर की बात करो असा त्यांचा स्टँड आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सांगलीतील जागेचा महाविकास आघाडीचा तिढा अद्यापही कायम असून विश्वजीत पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेवरही संजय राऊत यांनी मत मांडलं. लोकशाहीमध्ये या देशात कोणीही निवडणूक लढू शकतो, विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसशी कधीच बेईमानी केली नव्हती उमेदवारी हा वेगळा विषय आहे . काँग्रेसची जी काही परंपरा आहे ती परंपरा तोडून ते काही वेगळी भूमिका घेणार नाहीत, विशाल पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत, नक्कीच आम्ही पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू ,असे राऊत म्हणाले.

येत्या एक-दोन दिवसात महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर होईल. आज आम्ही शिवसेनेच मशाल गीत लोकांसमोर आणणार आहोत, पुढल्या काही दिवसात आमचा जाहीरनामा, वचननामा आम्ही प्रसिद्ध करू, असं राऊत यांनी नमूद केलं.