पवना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर लांडगे यांची बिनविरोध निवड उपाध्यक्षपदी जयनाथ काटे

0
314

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पवना सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर लांडगे तर उपाध्यक्षपदी जयनाथ काटे यांची बिनविरोध निवड झाली. सलग दुस-यावेळेस फेरनिवड करत लांडगे आणि काटे यांच्यावर संचालकांनी विश्वास टाकला आहे.

पवना सहकारी बँकेच्या 2023 ते 2028 या पाच वर्षांच्या संचालक मंडळासाठी नुकतीच निवडणूक झाली. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला. त्यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.

बँकेच्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर लांडगे यांचा आणि उपाध्यक्षपदासाठी जयनाथ काटे यांचा असे एकच अर्ज आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शीतल पाटील यांनी अध्यक्षपदी लांडगे यांची तर उपाध्यक्षपदी काटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार केला.

बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचाविला –
पवना सहकारी बँक ही शहरातील सर्वांत जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांनी सर्वांना बरोबर घेऊन बँकेची यशस्वीपणे वाटचाल सुरु ठेवली. सर्वांना सोबत घेवून बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला. कामगारनगरी पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य, कष्टकरी नागरिकांची ‘अर्थवाहिनी’ अशी पवना सहकारी बँकेची ओळख निर्माण केली.

भागधारक, खातेधारक आणि संचालक मंडळांनी पुन्हा एकदा आमच्यावर मोठा विश्वास टाकला आहे. सभासदांच्या विश्वासाला तडा जावू दिला जाणार नाही. सर्वांना सोबत घेवून बँकेचे कामकाज केले जाईल. बँकेचे कार्यक्षेत्र आणि कार्यकक्षा विस्तारीकरण केले जाईल. पवना बँकेला ‘शेड्युल बँके’चा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. बँकेच्या सद्यस्थितीत 22 शाखा कार्यरत असून आणखी 5 नवीन शाखा लवकरच सुरु होतील. ग्राहकांच्या सोयीसाठी विविध योजना राबविल्या जातील, असे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.