पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांचे प्रदूषण थांबवा; दोषींवर कारवाई करा

0
374

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरासह खो-यातील अनेक गावांची जीवनवाहिनी असलेल्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांची वाटचाल मृत अवस्थेकडे होत आहे. प्रदूषणामुळे नद्यांमधील परिसंस्थांची साखळी नष्ट होऊन जैवविविधता धोक्यात येत आहे. या नदी प्रदूषणाकडे राज्य शासन, जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनासह नागरिकांनी वेळीच लक्ष्य दिले नाही तर मोठा दुष्परिणाम पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यावर पर्यायाने मानवी जीवनावर आणि होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आणि जबाबदार घटकांचे लक्ष्य वेधण्यासाठी नागरिकांकडून पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पर्यावरण प्रेमी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांमध्ये परिसरातील कंपन्यांद्वारे प्रदूषित व रसायनयुक्त पाणी बेकायदेशीरपणे सोडण्यात येत आहे. तसेच परिसरातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटमध्ये बंद असलेल्या एसटीपी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात दुषित पाणी बेकायदेशीरपणे नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. तसेच शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यांद्वारे थेट नद्यांमध्ये सोडण्यात आल्याने या नद्यांना विशाल नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे या नद्या वारंवार फेसाळण्याचे प्रकार घडत आहेत. नद्यांना फेस येऊन हिमनद्या सारखे स्वरूप प्राप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार देखील करण्यात आली आहे. तथापि, महापालिका प्रशासन वेळकाढू पद्धतीने काम करत असून पर्यावरण विभागातील मोठे अधिकारी यांचे संबधित कंपन्यांशी लागेबंध असल्याने हितसंबंध जपण्याचे काम पर्यावरण विभागाकडून पर्यायाने महापालिकेकडून करण्यात येत असल्याचे नागरिकांनी म्हटले.

नद्यांमध्ये सोडलेल्या प्रदूषित पाण्यामुळे मानवी जीवनासह नद्यांवर अवलंबून असलेल्या अनेक जैवविविधतांवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संबंधित घटकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावे तसेच स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या स्थानिक प्रशासनास या घटनेस जबाबदार धरून संस्था व त्याच्या प्रमुखावर देखील गुन्हा दाखल करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी नागरिकांकडून राज्य सरकारकडे करण्यात आली.

पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या गाड्या व नागरिकांना यावेळी निदर्शन फलक दाखवून जनजागृती करण्यात आली. तसेच प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.