पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी पुन्हा हालचाली

0
399

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – मागील 11 वर्षांपासून रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

आयुक्त सिंह म्हणाले, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणा-या 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यासाठीचे निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचेही (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे. लवकरच त्याचे उद्घाटन केले जाईल. त्यामुळे 100 एमएलडी वाढीव पाणी मिळेल. त्यानंतर पाण्याच्या तक्रारी कमी होतील.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे आहेत. खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी 31 डिसेंबर 2022 ची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजविले जातील. कोणत्याही कामासाठी रस्ता खोदल्यास काम झाल्यानंतर ते तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. दिशादर्शक, सूचना बोर्ड लावले पाहिजेत. त्यासाठीच्या सूचना दिल्या असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.