पवना धरण परिसरात पाऊस ओसरला; धरणात गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

0
551

पिंपरी दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 83.99 टक्के पाणीसाठा होता. यंदा आजमितीला 81.23 टक्के पाणीसाठा आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत  पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले होते. त्यातच यंदा पावसानेही मोठी ओढ दिली होती.

जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिकेनेही आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, 1 जुलै पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे वाढीव पाणीकपात टळली. परंतु, मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे.
त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 83.99 टक्के पाणीसाठा होता. यंदा आजमितीला 81.23 टक्के पाणीसाठा आहे.