पवना धरणातून काढला १५ हजार क्युबिक मीटर गाळ; पाणीसाठ्यात झाली मोठी वाढ

0
293

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून दरवर्षी काढला जातोय गाळ

पिंपरी, दि. १९ (पीसीबी)- मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पवना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने पवना धरणातून गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील सात वर्षांपासून हे गाळ काढण्याचे काम दरवर्षी केले जाते. यावर्षी आतापर्यंत तब्बल १५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. धरणातील गाळ शेतक-यांना शेतात टाकण्यासाठी उपयोगी पडत आहे. त्यामुळे शेतक-यांनाही फायदा होत असल्याचे खासदार बारणे म्हणाले.

पवना धरणातील गाळ काढण्याच्या कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 19) पाहणी केली. शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, माजी सभापती शरद हुलावळे, युवा सेना अध्यक्ष विशाल हुलावळे, युवा सेना उपाध्यक्ष नितीन देशमुख, अमित कुंभार, दिनेश ठाकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या भागासाठी पाणी पुरवठ्याचा पवना धरण मुख्य स्त्रोत आहे. पवना धरणाचे काम सन 1972 साली पूर्ण झाले. परंतु, धरणातील साठवण क्षमता वाढविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाही. त्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील सात वर्षांपासून गाळ काढला जात आहे. आत्तापर्यंत 76 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे धरणातील साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. गाळ काढल्यामुळे पाणीसाठा अधिकचा राहत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांवरील पाणीसंकट टळले. धरणातून काढलेला गाळ शेतक-यांना दिला जातो. पवना धरण परिसरात नर्सरी, फळबागांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी गाळाचा उपयोग केला जातो. त्यामुळे शेतक-यांना देखील फायदा होतो. गाळ घेऊन जाणा-या चालकांनी डंपरच्या क्षमतेपेक्षा जास्त गाळ भरुन वाहतूक करु नये. गावक-यांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी गाळ घेऊन जाणा-यांना केल्या.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पवना धरणातील गाळ काढण्याचे काम मागील सात वर्षांपासून चालू आहे. पिंपरी-चिंचवड शहर, तळेगाव दाभाडे, एमआयडीसीच्या क्षेत्राला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात या धरणात आजुबाजूच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात गाळ येतो. त्यामुळे पाणी साठण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यापार्श्वभूमीवर सात वर्षांपासून धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. कोरोनामुळे दोन वर्ष गाळ काढला नाही. यंदा पुन्हा परवानगी घेऊन गाळ काढण्याचे काम सुरु आहे. धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेची मदत न घेता सामाजिक संस्था, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मदतीने गाळ काढला जात आहे. मागील सात वर्षात धरणातून 76 हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे.”.

पवना नदीच्या स्वच्छतेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार

पवना नदीपासून पिंपरी-चिंचवड शहरापर्यंत नदीत येणारे नाले आणि नदीत मिसळणारे अशुद्ध पाणी थेट नदीत येऊ नये यासाठी एसटीपी प्लांट बसविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जावे, यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने संबंधित कंपन्या आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. खासदार श्रीरंग बारणे हे पवना नदीच्या स्वच्छतेसाठी चांगले काम करत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे शासन आपल्या दारी या उपक्रमात बोलताना केला होता.