पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात धरण परिसरात 110 मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठ्यात 4 टक्यांनी वाढ झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा 86.34 टक्क्यांवर पोहोचला आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. यंदा उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले होते. त्यातच यंदा पावसानेही मोठी ओढ दिली होती.
जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिकेनेही आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, 1 जुलै पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे वाढीव पाणीकपात टळली. परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा झाला होता. मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.
पवना धरणातील परिस्थिती!
# गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 110 मि.मि.*
# 1 जूनपासून झालेला पाऊस = 1, 831 मि.मि.*
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 1,972 मि.मि.*
# धरणातील सध्याचा पाणीसाठा = 86.34 टक्के
#मागील चोवीस तासात वाढलेला पाणीसाठा – 4 टक्के
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 94.17 टक्के*












































