मुंबई, दि. २७ जुलै (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून प्रकल्पाचा “जैसे थे” आदेश रद्द करावा, अशी भूमिका मांडली.
पवना नदीतून पाणी उचलण्यापेक्षा पवना बंद पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठ्याचे फायदे:
◆ पाण्याची कमी हानी: नैसर्गिक नद्यांपेक्षा बंद पाईपलाईनमध्ये गळती होण्याची शक्यता कमी असते, याचा अर्थ वापरासाठी जास्त पाणी उपलब्ध असते.
◆ पाण्याची उत्तम गुणवत्ता: नैसर्गिक नद्यांपेक्षा बंद पाईपलाईन प्रदूषकांमुळे दूषित होण्याची शक्यता कमी असते, सध्या रावेत बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा करून ते शुद्धीकरणासाठी निगडी येथे पाईपलाईन द्वारे पाठवले जाते. पवना धरण ते रावेत बंधारा हे अंतर अंदाजे 35 किमी आहे. या भागात वाढत्या शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे प्रदूषित पाणी थेट पवना नदीत मिसळले जाते. हे पाणी शुद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात. बंद जलवाहिनीमुळे जलशुद्धीकरण केंद्रावरची जोखीम कमी होईल तसेच खर्चामध्ये बचत शक्य होईल.
◆ गावकऱ्यांचा गैरसमज: बंद पाईपलाईन मुळे पवना नदीचे पाणी आटेल असा मावळ मधील शेतकऱ्यांचा गैरसमज आहे याला कोणतेही शास्त्रीय प्रमाण नाही. बंद पाईपलाईन मुळे नदीवर किंवा त्याच्या सभोवतालच्या जैवव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही
◆ नदी कायम प्रवाहित राहील: बंद पाईपलाईनद्वारे पवना धरणातून शहराला मंजूर कोट्याएव्हढेच पाणी उचलले जाईल. धरणातून सोडलेले व भूगर्भातून नदीला मिळणारे पाणी यामुळे नदी कायम प्रवाहित राहील
◆ देशातील इतर शहरांची स्थिती: पिंपरी चिंचवड शहर विस्ताराचा वेग अधिक आहे. देशभरातील मोठ्या शहरांना त्यांच्या नजीकच्या धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पुरवठा होतो. त्यामुळे जर बंद पाईपलाईन प्रकल्प राबवला नाही तर 30 लाख नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखे होईल.