पवना, इंद्रायणी संवर्धनासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी; स्वयंसेवी संस्थाचे आयुक्तांना साकडे

0
330

पिंपरी दि.१३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनदायिनी असणाऱ्या पवना आणि इंद्रायणी या दोन नद्या प्रदूषण मुक्त होऊन स्वच्छ-सुंदर- हरित होत प्रवाही होण्यासाठी सामाजिक संस्था नागरिक आणि प्रशासन यांच्या सहयोगाने शहरात जागृती आणि प्रत्यक्ष काम कसे करता येईल? याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे सांकडे शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना घातले.

पवना आणि इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त उपायुक्त अजय चारठणकर, जलबीरादरी संस्थेचे नरेंद चुग, विनोद बोधनकर, सुमंत पांडे, अविरत श्रमदान संस्थेचे सचिन लांडगे, डॉ. निलेश लोंढे आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी तर्फे गणेश बोरा आदी उपस्थित होते.या भेटीत नदीची सध्य परिस्थिती, प्रदूषणाची कारणे आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली.

तसेच, नदी संवर्धन, नदी स्वच्छ्ता अभियान, जनजागृती मोहीम , जल दिंडी, नदीयात्रा , जलपर्णी, नदीत मिसळणारे सांडपाणी, नदी किनारी मार्शलमार्फत कचरा टाकण्यास अटकाव करणे, नदीत मिश्रित होणारा घनकचरा प्लास्टिक याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नदी संवर्धनासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून, स्वयंसेवी संस्था- संघटनांच्या उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.