पवनाथडी जत्रेला खव्वयांची रेलचेल

0
144

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) :- यंदाच्या पवनाथडी जत्रेत पिंपरी चिंचवड शहरवासियांना शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळत आहे. चविष्ट अशा महाराष्ट्रीयन पाककलेच्या समृद्ध वारशाचा आनंद घेण्यासाठी खव्वयांनी शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सच्या बाहेर गर्दी केली. यंदाच्या जत्रेमध्ये प्रवेशद्वारापासूनच वैविध्यपुर्ण सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जी आकर्षित करणारी ठरली आहे. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने संध्याकाळी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ११ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात आली आहे. या पाच दिवसीय जत्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जत्रेचा आनंद घेण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रा लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. याठिकाणी केलेली नेत्रदिपक विद्युत रोषणाई, रचनात्मक स्टॉल्सच्या रांगा, पारंपारिक बैलगाडी व शेती साहित्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून सेल्फी काढण्यासाठी याठिकाणी लोकांची गर्दी होत आहे. जत्रेमध्ये स्त्रियांसाठी कॉस्मेटिक्स, बॅग्स, साड्या, भांडी तर लहान मुलांसाठी खेळणी, पुस्तकं, कार्टूनच्या बाहुल्यांची असंख्य स्टॉल्स उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर वेगवेगळी लोणची, पापड, कुरड्या, डाळी अशा घरगुती पदार्थांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी वाढताना दिसत आहे. पुरुषांसाठी चप्पल-बुट, खादीचे कपडे, कुर्ते, टोप्या, रुमाल, गॉगल्स, ब्रेसलेट्स, घड्याळ इत्यादींचे स्टॉल्स पाहायला मिळत आहेत. तर हुरड्यासह विविध शुद्ध शाकाहारी तसेच चमचमीत मांसाहारी खाद्यपदार्थ्यांच्या मेजवाणीवर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत.

या जत्रेमध्ये लहान मुलांसोबत तरूण, ज्येष्ठ नागरिकही आकाशी पाळणा, ड्रॅगन ट्रेन, झिग झॅग रोलर अशा अनेक अंगावर शहारे आणणाऱ्या खेळण्यांचा अनुभव घेताना दिसत आहेत. जत्रेच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची बैठक व्यवस्था असलेले सांस्कृतिक दालन उभारण्यात आले आहे. जेथे ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी अशा अनेक लोककलांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून विविध भागातील पारंपरिक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी ‘म्युझिक मेकर्स’ हा सुमधूर गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला ज्यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर ‘खेळ रंगला पैठणीचा- होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सादर झाला ज्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला.

दरम्यान, दिव्यांग, तृतीयपंथींच्या सामाजिक व आर्थिक समावेशनासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून त्यांच्यासाठीही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याद्वारेही येथे विविध वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. यासोबतच १८ ते ३० वयोगटातील युवक व युवतींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महापालिका राबवित असलेल्या लाईट हाऊस उपक्रमात तरूणांनी सहभाग घ्यावा, त्याबाबत माहिती घ्यावी यासाठी माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. या स्टॉललाही तरूणांचा उस्फुर्त प्रतिसाद भेटत असल्याचे दिसुन येत आहे.

पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी, कायदा व सुवव्यवस्थेसाठी सुरक्षा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि पोलीस दलाच्या जवानांसह आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन बंब, सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात आली असल्याची माहिती समाज विकास विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी दिली आहे.