- विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने रसिक झाले मंत्रमुग्ध
पिंपरी, दि. २३ ( पीसीबी )– पवनाथडी जत्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी २३ फेब्रुवारी रोजी नागरिकांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली. चविष्ट अशा महाराष्ट्रीयन पाककलेच्या समृद्ध भोजनाचा आनंद घेण्यासाठी खव्वयांनी शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सच्या बाहेर गर्दी केली होती. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने संध्याकाळी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे तसेच महिलांचे सबलीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रा भरविण्यात आली आहे. या पाच दिवसीय जत्रेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी जत्रेचा आनंद घेण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. याठिकाणची नेत्रदिपक विद्युत रोषणाई, रचनात्मक स्टॉल्सच्या रांगा आणि सेल्फी काढण्यासाठी तयार केलेल्या सेल्फी पॉईंट्सवर लोकांची गर्दी होत आहे. जत्रेमध्ये कॉस्मेटिक्स, बॅग्स, साड्या, भांडी या स्टॉल्सवर महिलांची गर्दी होताना दिसत आहे. तर लहान मुलांसाठी खेळणी, पुस्तकं, कार्टूनच्या बाहुल्यांची असंख्य स्टॉल्स येथे उपलब्ध आहेत. शिवाय वेगवेगळी लोणची, पापड, कुरडया, डाळी अशा घरगुती पदार्थांची खरेदी करण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. याव्यतिरिक्त हुरड्यासह विविध शुद्ध शाकाहारी तसेच चमचमीत मांसाहारी खाद्यपदार्थ्यांच्या मेजवाणीवर खवय्ये ताव मारताना दिसत आहेत.
लहान मुलांसोबत तरूण देखील आकाशी पाळणा, ड्रॅगन ट्रेन, झिग झॅग रोलर अशा अनेक खेळण्यांचा अनुभव घेताना दिसत आहेत. जत्रेच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची बैठक व्यवस्था असलेले सांस्कृतिक दालन उभारण्यात आले आहे. जेथे ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा अशा अनेक लोककलांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी एस. के. कांबळे प्रस्तूत ‘जागर स्त्री शक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम पार पडला ज्यामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. यामध्ये अनेक महिला कलाकारांनी सहभाग घेतला आणि आपली कला सादर केली.
दिव्यांग, तृतीयपंथींच्या सामाजिक व आर्थिक समावेशनासाठी राखीव स्टॉल्स*
दिव्यांग, तृतीयपंथींच्या सामाजिक व आर्थिक समावेशनासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असून त्यांच्यासाठीही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांच्याद्वारेही येथे विविध वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत स्वच्छतेबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने माहिती कक्ष*
१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेची पातळी मोजण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२५ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबद्दल जनजागृती वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची माहिती नागरिकांना व्हावी तसेच कचरा विलगीकरण प्रक्रिया, RRR आणि कचऱ्यापासून खतनिर्मिती आदी बाबींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पवनाथडी जत्रेमध्ये स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे. या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये नागरिकांना सहभागी करून घेऊन क्युआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मच्या आधारे नागरिकांचे प्रतिसाद नोंदविण्यात येत आहेत.
युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लाईट हाऊस उपक्रमाअंतर्गत माहिती कक्ष*
१८ ते ३० वयोगटातील युवक व युवतींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महापालिका राबवित असलेल्या लाईट हाऊस उपक्रमात तरूणांनी सहभाग घ्यावा, त्याबाबत माहिती घ्यावी यासाठी माहिती कक्ष उभारण्यात आला आहे. या माहिती कक्षासही युवा तरुण तरुणी भेट देत आहेत.
कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अग्निशामक,आपत्ती,सुरक्षा आणि वैद्यकीय व्यवस्था*
पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचे कर्मचारी, कायदा व सुवव्यवस्थेसाठी सुरक्षा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि पोलीस दलाच्या जवानांसह आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन बंब, सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.