दि.०५(पीसीबी) -नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्राम प्रकल्पासाठी १७०० ते १८०० झाडे तोडण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय सध्या मोठ्या वादाला तोंड देत आहे. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांच्या निवासासाठी हा प्रकल्प प्रस्तावित असला तरी पर्यावरणवादी, कलावंत, विविध संघटना आणि अनेक राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
या मुद्द्यात आता राजकीय तापमानही वाढले आहे. पर्यावरणवाद्यांवर टीका करत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ईदच्या वेळी बकरी कापण्याच्या प्रश्नाला जोडत “तेव्हा हे कार्यकर्ते गप्प का?” असा सवाल उपस्थित केला होता. राणे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना (ठाकरे गट) भडकला असून नेते अखिल चित्रे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तरात जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं
“वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे, धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्यांना वृक्षतोडसारखा गंभीर विषय समजणार नाही. त्यांच्या सिस्टीममध्ये हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल ‘unsupported format’ म्हणूनच उघडत नाही.”
यामुळे तपोवन मुद्द्यावर नवा राजकीय वाद उसळला आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक महापालिकेने साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील ५४ एकर परिसरातील झाडे तोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याला अभिनेता सयाजी शिंदे, पर्यावरणप्रेमी, विद्यार्थ्यांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत मोठा विरोध मिळत आहे. आंदोलनही सुरू आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचे म्हणणे ऐकून “समोपचाराने तोडगा काढा” असा सल्ला प्रशासनाला दिला.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५-१६ च्या गूगल मॅपचा दाखला देत सांगितले की, त्या ठिकाणी तेव्हा झाडे नव्हती; राज्य सरकारच्या ५० कोटी वृक्षलागवड मोहिमेनंतर तिथे जंगलासारखी दाटी झाली असून आता साधुग्रामसाठी जागा अरुंद पडत असल्याचे त्यांचे मत आहे.













































