पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचेच अपहरण

0
2

विमानाने झारखंडला नेऊन गंगा नदीपात्रातील एका बेटावर डांबले

झारखंड पोलिसांच्या मदतीने घरमालकाची सुखरूप सुटका

पिंपरी, , दि. 22 (पीसीबी) : भाडेकरूने साथीदारांसोबत पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचेच अपहरण केले. अपहृत घरमालकाला थेट विमानाने झारखंड येथे नेऊन गंगा नदीपात्रातील एका बेटावर डांबून ठेवले आणि मुलाला फोन करून एक कोटीची खंडणी मागितली. दरम्यान, पिंपरी – चिंचवड पोलीस आणि झारखंड पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत अपहृत घरमालकाची सुखरूप सुटका केली. ही घटना वाकड येथील विनोदे वस्ती येथे घडली.

यशवंत विनोदे (वय ५५ रा. विनोदे वस्ती, वाकड) असे सुटका झालेल्या अपहृत व्यक्तीचे नाव आहे. नसीम मनीरुल हक अख्तर (वय २०, रा. धरमपूर, तीनमुहानी, पश्चिम बंगाल) लल्लू रुस्तम शेख (वय ४५, रा. अमानत दियारा, राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड), साजीम करिम बबलू शेख (वय २०, रा. छक्कुटोळा, ता. मोथाळवाडी, जि. मालदा, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तीन आरोपी गंगा नदीत उडी मारुन पळून गेले.

आरोपींकडून ७० हजार रूपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपी साजीम याला कल्याण येथून जेरबंद केले. ओमकार विनोदे (वय ३५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ओमकार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर, वडील यशवंत यांच्या नावाने चाळ असून अनेक खोल्या भाड्याने आहेत. आरोपींपैकी एकजण नारळ विक्रेता असून विनोदे यांच्या खोलीत भाडेकरू म्हणून राहतो. १८ ऑक्टोबर रोजी ओमकार याने खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक यांना भेटून माहिती दिली की, त्यांचे वडील यशवंत हे १७ ऑक्टोबर पासून घरी नसून वडीलांच्या मोबाईलवरुन एकाने कॉल करून १ कोटी रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास तसेच पोलीसांकडे गेल्यास वडीलांना जीवे मारु, अशी धमकी दिली, असे सांगितले. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, युनीट चारचे संदिप सावंत आणि गुंडा विरोधी पथक यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. तपास करीत असताना अपहरण झालेल्या यशवंत यांना पर्यटनाच्या बहाण्याने त्यांचा भाडेकरू असणारा नारळ पाणी विक्रेता विमानाने कोलकाता येथे घेवून गेल्याचे निष्पन्न झाले. पुणे विमानतळावरील कोलकत्त्याला जाणार्‍या विमानातील प्रवाशांची माहिती घेवून, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयीत व्यक्तींची माहिती प्राप्त करण्यात आली. फौजदार सुनिल भदाणे, अशोक जगताप, प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव व रामदास मोहिते यांना अपहृत आरोपींचा शोध घेणेकरीता झारखंड व पश्चिम बंगाल राज्यात रवाना करण्यात आले.

दरम्यान, ओमकार यांना आरोपी त्यांच्या वडीलांच्या फोनवरुन १ कोटी लवकर जमा कर, पोलीसाकडे गेल्यास अगर काही गडबड केल्यास तुझ्या वडीलांना ठार मारु, अशी धमकी देवून रात्री दहापर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो असे सांगून, फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सांयकाळी साडेसात वाजता आरोपींनी फोन करुन, पैसे किती जमा झाले. अर्धा तासात पुणे रेल्वे स्टेशन येथे घेवून ये. असे कळवून फोन बंद केला. ओमकार यांना सतत खंडणीच्या पैशाकरीता फोन येत असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यांनी पोलीस अधिक्षक, मालदा, (पश्चिम बंगाल) व साहीबगंज (झारखंड) यांच्याशी संपर्क करुन, दाखल गुन्ह्याबाबत माहिती देवून तपासात मदत करण्याबाबत कळविले. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पथक तसेच झारखंड पोलीसांच्या पथकाने रात्रीच्या अंधरात आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खोऱ्यात गंगा नदीतून बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करून माग काढला. गंगा नदी पात्रात गोलढाब बेटावर छापा मारून पहाटे पाच वाजता यशवंत यांची सुखरुप सुटका केली.


ही कारवाई खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, युनिट चारचे पोलीस निरीक्षक संदीप सावंत, फौजदार सुनिल भदाणे, रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, मंगेश जाधव आशिष बोटके भुपेंद्र चौधरी, गुंडा विरोधी पथकाचे फौजदार अशोक जगताप, रामदास मोहिते, युनिट चारचे प्रशांत सैद, सुखदेव गावांडे, अमर राणे, नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.