‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
2

पिंपरी, दि. १२ -‘परीक्षेला सामोरे जाताना’ या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट युथ टीम आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या (एस. एस. सी.) मार्च २०२५ मधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिरात लायन्स क्लब इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ विजय सारडा, युथ टीमचे अध्यक्ष एमजेएफ प्रदीप कुलकर्णी, पुणे प्रांतपाल बी. एल. जोशी, महानगरपालिका संगणक विभागप्रमुख नीळकंठ पोमण, प्रा. शैलजा सांगळे, लायन शशांक फाळके, लायन वसंत कोकणे, लायन मीनांजली मोहिते आणि नंदिता देशपांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे समन्वयक लायन अनुजा करवडे आणि लायन उज्ज्वला कुलकर्णी होत्या.

याप्रसंगी विजय सारडा यांनी, “दहावीची परीक्षा हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. घर, समाज आणि देश यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवयुवकांना अशा विशेष शिबिरांच्या माध्यमातून सक्षम करणे अतिशय स्तुत्य आहे!” असे गौरवोद्गार काढले. बी. एल. जोशी यांनी, “विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांची विचारसरणी आत्मसात करावी!” असे आवाहन केले. नीळकंठ पोमण यांनी, “महानगरपालिकेकडून अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य लाभेल!” अशी ग्वाही दिली. प्रा. शैलजा सांगळे यांनी गेल्या वर्षापेक्षाही या वर्षी शिबिराला खूप मोठा प्रतिसाद लाभला आहे, असे मत व्यक्त केले. प्रदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून, “विवेकानंद जयंती हा दिवस राष्ट्रीय युवादिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून या विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. परीक्षेला सामोरे जाताना मनात जी धाकधूक असते ती यातील मार्गदर्शनानंतर निश्चितच आत्मविश्वासात रूपांतरित होईल!” असा विश्वास व्यक्त केला.

या मार्गदर्शन शिबिरात एसएससी बोर्ड सदस्य डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित) आणि अर्चिता मडके (एक्झाम टेक्निक्स) यांनी संबंधित विषयांबाबत चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत अनौपचारिक शैलीतून सुलभ मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना नि:शुल्क सराव प्रश्नोत्तर संचाचे तसेच खाऊचे वितरण करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या या विशेष उपक्रमात परिसरातील अन्य चौदा क्लबनी सहभाग घेतला होता. अनुजा करवडे यांनी सूत्रसंचालन केले. शशांक फाळके यांनी आभार मानले.