मुंबई २८ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात एका कार्यक्रमातबोलताना नितीन गडकरी यांनी उद्योजकांसमोर काही वक्तव्ये केली आहेत. रिचर्ड निक्सन यांचा हवाला देत, गडकरी म्हणाले की जेव्हा कोणताही व्यक्ती पराभूत होतो, याचा अर्थ तो संपत नाही मात्र जेव्हा तो स्वत: पराभव स्वीकारतो, त्याचवेळी तो संपतो. याचवेळी त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीचा भाग होऊ नका, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मंत्र या कार्यक्रमातक दिला. गडकरी म्हणाले की, जे ही कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वात मोठी ताकद आहे. एखाद्याचे चांगले दिवस असो वा वाईट दिवस असो, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला असेल म्हणजेच त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असा सल्ली यावेळी गडकरी यांनी उपस्थित उद्योजकांना दिला. प्रत्येक वेळी उगवत्या सूर्यालाच नमस्कार करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यावे्ळी त्यांनी श्रीकांत जिचकार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
नितीन गडकरी त्यांच्या तरुण वयात विद्यार्थी चळवळीत काम करीत होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते. त्यावेळी श्रीकांत जिचकार यांना दिलेले उत्तर गडकरींनी या कार्यक्रमात सांगितले. त्यावेळी ते श्रीकांत जिचकार यांना म्हणाले होते की, मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही. कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही. यावेळी बोलताना गडकरी यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, असा सल्ला गडकरींनी या उद्योजकांना दिला. निक्सन यांच्या आत्मचरित्रातील पराभवानंतर माणसाचा अंत होत नाही, मात्र त्याने स्वता जर हा पराभव मान्य केला तर तो संपतो, हे वक्तव्य कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.
त्यापूर्वी गुरुवारी नितीन गडकरी यांनी त्यांच्या टीकाकारांवर आणि माध्यमातील एका समुहावर जोरदार टीका केली होती. राजकीय फायद्यासाठी त्यांच्या वक्तव्यांना चुकीच्या आधाराने सादर करण्यात येत असल्याचा आक्षेप गडकरींनी नोंदवला आहे. आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहत असलेल्या गडकरी यांना गेल्याच आठवड्यात भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवण्यात आले आहे. सरकार आणि पार्टीच्या हितासाठी, अशा प्रकारे वक्तव्यांचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना आणि टीकाकारांना कायदेशीर आव्हान देणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. गडकरी यांनी याबाबत एक ट्विट केले होते, त्यात त्यांनी लिहिले होते की- आज पुन्हा एकदा मुख्य माध्यमस सोशल मीडियातील एक गट आणि काही जण राजकीय फायद्यासाठी, माझ्याविरोधात घृणास्पद आणि मनाला येईल ते अभियान राबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यांना आधीच्या संदर्भाशिवाय दाखवण्यात येते आहे. मंगळवारी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यकमातील त्यांच्या भाषणाची यू ट्यूबची लिंकही त्यांनी समाज माध्यमांवर पाठवली आहे. याच कार्यक्रमातील त्यांच्या एका वक्तव्याचा उपयोग सोशल मीडियावर करण्यात आला होता.