पराभवाची भीती, राष्ट्रवादीकडील पिंपरीच्या जागेवर भाजपचा दावा, प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचाही इशारा

0
141

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजितदादांचा बारामतीनंतरचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे हद्दपार करायची भाजपची मोठी खेळी समोर आली आहे. महायुतीमध्ये ज्याचा जिथे आमदार तिथे ती जागा त्या पक्षाकडे राहिल, असे जागावाटपाचे सूत्र ठरलेले असताना भाजपने ही जागा कमळ चिन्हावरच लढवली जावी अशी आग्रही मागणी केली आहे. प्रसंगी इथे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, अशी ठोस भूमिका पक्षाच्या दोन्ही आमदारांनी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोरवाडी येथील पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित बैठकित त्याबाबत अत्यंत आवेशपूर्ण चर्चा झाली.
यावेळी आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, प्राधिकऱणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, महिला शहराध्यक्षा सुजात पालांडे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक शितल शिंदे, माऊली थोरात, प्रवक्ते राजू दुर्गे, संजय मंगोडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

पिंपरी राखीव मतदारसंघावर खरे तर पहिल्या पासून भाजपचाच हक्क असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी आग्रहाने नमूद केले. राज्यात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रचंड नाराजीचा सूर आहे. स्थानिक आमदारांबद्दल मतदारांत निराशेचा सूर आहे. अशा परिस्थितीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढविली तर महाविकास आघाडीचा उमेदवार इथे जिंकण्याची दाट शक्यता आहे. परभाव टाळायचा असेल तर राष्ट्रवादीची ही जागा भाजपला द्यावी. लोकसभा निवडणूक काळात मावळची जागा कमळ चिन्हावर लढवावी, अशी मागणी केली होती. आघाडी धर्म पाळून भाजपने जोरदार प्रचार केला म्हणून महायुतीचे श्रीरंग बारणे चिंचवडमधून ७७ हजाराचे आणि पिंपरीत १७ हजाराचे लीड घेऊन जिंकले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांनी प्रचाराकडे दुर्लक्ष केल्याचे खुद्द खासदार बारणे यांनी जाहीरपणे सांगितले आणि प्रचार न करणाऱ्यांची नावासह यादी पाठवली.
बैठकितील चर्चेची माहिती देताना आमदार खापरे म्हणाल्या,

मागच्यावेळी अमर साबळे उमेदवार होते. त्यांचा निसटता पराभव झाला. नंतर हा आरपीआयला सुटला. भाजपची ताकद आता ताकद दुपप्ट झाली आहे. पिंपरी मतदारसंघात भाजपचे आता १४ नगरसेवक आहेत. लोकसभेलासुध्दा महायुतीच्या खासदारांना आम्ही १७ हजारांची आघाडी दिली. कारण भाजपची बूथ प्रमुख, पन्ना प्रमुखांपासूनची मोठी ताकद इथे आहे. त्यामुळे निश्चितच हा वार्ड भाजपलाच मिळाला पाहिजे, अशी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. भाजपच्याच कार्यकर्त्याला इथे संधी द्यावी आणि कमळ चिन्हच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे. इतर पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी, कोण उमेदवार असावा याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही.

सदाशिव खाडे म्हणाले, भाजपला पिंपरी विधानसभा पाहिजे, असा हा विषय आहे. आम्हाला कमळावर मतदान करायची संधी मिळावी असे कार्यकर्ते म्हणतात. आमचा कोणा व्यक्तीला विरोध नाही. आमदार अमित गोरखे म्हणाले, हा मतदारसंघ भाजपलाच कसा सुटेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. राजू दुर्गे म्हणाले, आम्हाला काही झाले तरी कमळ चिन्हा द्यावे हा आग्रह सर्वांनी धरला. लोकसभेला आम्हाला कमळ चिन्ह नाही दिले. आतासुध्दा ते नसेल तर आता काम करून उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेची प्रचंड नाराजी आहे. काही झाले तरी हा मतदारसंघ भाजपलाच सोडवा अन्यथा प्रसंगी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्यावी, पण कमळ द्याच हा आग्रह आहे. दरम्यान, भाजपने आग्रही मागणी केल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे अडचणीत आले आहेत. भाजपकडून माजी खासदार अमर साबळे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, युवा आघाडीच्या तेजस्विनी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.

रिपाईच्या सोनकांबळे उमेदवारीसाठी आग्रही –
दोन वेळा पिंपरी मतदारसंघातून सुमारे ५० हजाराच्या दरम्यान मते मिळविलेल्या आरपीआय प्रदेश सरचिटणीस आणि जेष्ठ माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे यासुध्दा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. महायुतीत रिपाई असल्याने पिंपरीची जागा रिपाईला सोडा, फक्त मतदानापुरता रिपाईचा वापर करू नका, असे सोनकांबळे यांनी वारंवार म्हटले आहे.