परस्पर 40 लाख 70 हजारांचे कर्ज काढून घेत तिघांची फसवणूक

0
385

हिंजवडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल

हिंजवडी, दि. ०८ (पीसीबी) – बेकायदेशीर पार्सल आले असल्याचे सांगत बँक खात्याची गोपनीय माहिती घेत नागरिकांच्या परस्पर त्यांच्या नावावर 40 लाख 70 हजार 195 रुपयांचे कर्ज काढून घेत तरुणाची फसवणूक केल्याचे तीन प्रकार उघडकीस आले आहेत. या तिन्ही प्रकरणी 7 मार्च रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात जुबेर दस्तगीर मुल्ला (वय 27, रा. बालेवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7715762158 क्रमांक धारक आणि cid.8af21d2d551a08a2 हा स्काईप आयडी धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या प्रकरणात नागेश संभाजी हजारे (वय 42, रा. माण, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8116574684 / 8109551520 क्रमांक धारक आणि मुंबई एनसीबी विभाग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या प्रकरणात एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8214688399 / 8217208544 क्रमांक धारक आणि live.cid.845b7373189abc0c या स्काईप आयडी धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनोळखी व्यक्तीने फिर्यादी मुल्ला, हजारे आणि महिलेला फोन केला. तुमचे बेकायदेशीर पार्सल आले असून त्याबाबत तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मुल्ला यांना फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्यांनतर स्काईप आयडी देऊन फिर्यादींचे विश्वास संपादन करत आरोपीने त्यांच्याकडून ओटीपी घेतले. त्याआधारे मुल्ला यांच्या नावावर 16 लाख 70 हजार रुपयांचे, हजारे यांच्या नावावर 19 लाख 94 हजार 101 रुपयांचे तसेच महिलेच्या नावावर 4 लाख 6 हजार 94 रुपयांचे असे एकूण 40 लाख 70 हजार 195 रुपयांचे पर्सनल लोन घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.