परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजनेतील लाभाची रक्कम वाढवा, सिमाताई सावळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

0
443

पिंपरी, (दि. १२) – मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय युवक, युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य” योजनेतील लाभाची रक्कम वाढविण्याची आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

आपल्या पत्रात त्या म्हणतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतील “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय युवक, युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य” या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी रक्कम रुपये १ लाख ५० हजार चा लाभ दिला जातो. महापालिकेच्या या अत्यंत चांगल्या योजनेमुळे मागासवर्गीय समाजातील अनेक युवक व युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. सदर योजनेचा लाभ अनेक विद्यार्थी घेत आले आहेत.

मागील काही वर्षांमध्ये परदेशातील शैक्षणिक संस्थांची “फी” आणि इतर खर्च वाढले आहेत. कोविड कालानंतर विमानाच्या तिकिटांचे दर देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. तसेच डॉलर / युरो / पाउंड सारख्या इतर अनेक परकीय चलनाचा दर देखील २५ ते ३० % ने वाढले आहेत. अशा स्थितीत मागासवर्गीय समाजातील अनेक युवक व युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारा खर्च मोठ्याप्रमाणात वाढला आहे. तरी या बाबींचा विचार करून उपरोक्त योजनेंतर्गत देण्यात येणारी मदतीची रक्कम वाढवून ४ ते ५ लाख रुपये पर्यंत करण्यात यावी. परदेशात शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याने सदर निर्णय आपण प्राधान्याने घ्यावा, अशी विनंती सिमाताई सावळे यांनी केली आहे.