पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने कोथरूड येथे ज्येष्ठ साहित्यिक आणि आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्काराने संस्थेचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ देऊन त्यांची कन्या सौ अनुजा देशपांडे आणि जावई अजित देशपांडे यांच्या उपस्थितीत कोथरूड येथील निवासस्थानी गौरविण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह कवी उद्धव कानडे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कामगारभूषण राजेंद्र वाघ,कवी धनंजय सोलंकर, संजय लांडे हे मान्यवर उपस्थित होते.सामाजिक समरसतेवर भाष्य असलेली कविता “कुणाचा कुणाशी द्वेष नसाया पाहिजे ” कवयित्री संगीता झिंजुरके यांनी सादर करून प्रारंभ करण्यात आला.
कवयित्री मानसी चिटणीस यांनी मानपत्राचे वाचन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक म्हणाले – ” काही सुयोग असतात. आजचा हा सुयोगदिन आहे. नारायण सुर्वे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संस्थात्मक काम करणाऱ्या संस्थेने मनोभावे दिलेला जीवनगौरव पुरस्कार आनंद देऊन गेला.माणसामध्येच देव आहे यावर विश्वास ठेवावा.
केशवसुत यांच्या मालगुडे येथील काव्यतीर्थावर कवींनी यावे अन् आपली कविता अर्पण करावी. यावेळी कर्णिक यांनी कुसुमाग्रज यांच्या आठवणी सांगितल्या.सुरेश कंक यांनी सूत्रसंचलन केले.