*स्व. लौकिक माटे सोशल फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान*
पिंपरी, दि.४ – ‘पद्मश्री गिरीश प्रभुणे हे समाजऋषी आहेत!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांनी एम. ई. एस. ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड येथे रविवार, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी काढले. स्व. लौकिक माटे सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना अनिल कवडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, डॉ. सतिश देसाई, महेश माटे, ज्येष्ठ कलाकार डॉ. संतोष बोराडे, माजी नगरसेवक विजय लांडे – पाटील, पिंपरी – चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ॲड. संकेत राव, लौकिक माटे सोशल फाउंडेशनचे संचालक ओंकार माटे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
अनिल कवडे पुढे म्हणाले की, ‘गिरीश प्रभुणे यांचे बहुआयामी कार्य हे समाजातील तरुणांसाठी प्रेरणास्थान असून ते समाजातील एकात्मतेला बळ देणारे आहे!’ ॲड. सतिश गोरडे यांनी प्रभुणे यांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून दिला. सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी, ‘हा माझा व्यक्तिगत सन्मान नसून माझ्या संपूर्ण कार्याचा सन्मान आहे. हे कार्य माझ्याकडून ईश्वराने करून घेतले आहे. समाजाप्रति तळमळ जागी झाल्यावर आपोआप कार्य करण्याची प्रेरणा मिळते. लौकिक फाउंडेशन असेच प्रेरणादायी कार्य समाजासाठी करीत आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले. ॲड. संकेत राव यांनी आभार मानले. ओम शाह, प्रशांत हडुले, अवधूत सावंत आणि माटे परिवार तसेच स्व. लौकिक माटे सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.
            
		














































