पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटून बेदम मारहाण

0
847

चाकण, दि. २८ (पीसीबी) – बंडगार्डन येथून राजगुरूनगर येथे जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला खेड तालुक्यातील वाकी जवळ चौघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याला मारहाण करून रोख रक्कम व कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना शनिवारी (दि. २५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

प्रवीण ज्ञानेश्वर सांडभोर (वय ४७, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण हे त्यांच्या दुचाकीवरून बंडगार्डन येथून राजगुरुनगर येथे घरी जात होते. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रवीण वाकी गावाजवळ आले. तिथे थांबलेल्या चौघांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला अंधारात नेऊन त्यांच्याकडील ३० हजार ७०० रुपये रोख रक्कम, लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, दोन एटीएम कार्ड अशी कागदपत्रे काढून घेतली. प्रवीण यांना चौघांनी मारहाण केली आणि चौघेही दोन दुचाकींवरून खेडच्या दिशेने पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.